Blogger Tips and TricksLatest Tips And TricksBlogger Tricks

आपले स्वागत करीत आहोत

Tuesday, 5 April 2016

सफर जलदुर्गाची


जेथे सागरा धरणी मिळते.. सफर जलदुर्गाची
यंदा एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच पाऱ्याची पातळी ४३ डिग्री सेल्शिअसपर्यंत पोहोचली आणि घामाच्या धारांनी अवघी मुंबई न्हाऊन निघाली. साधं घराच्या बाहेर पाऊल टाकायलाही कुणाचं मन धजावत नाहीये; इतका सगळ्यांनी उन्हाचा धसका घेतलाय! पण म्हणून काय. उन्हाळ्याच्या सुट्टीत फिरायला जायचं नाही? छे! मुळीच नाही. अहो, ‘येवा, कोकण आपलाच आसाम्हणत सिंधुरत्नअर्थात सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी हे दोन जिल्हे सर्वाच्या स्वागतासाठी सज्ज आहेत. गोव्यापेक्षाही सुंदर समुद्रकिनारे, डॉल्फिनचे दर्शन, स्नॉर्केलिंग, विविध वॉटर स्पोर्टस् तुम्हाला आलेला थकवा नक्कीच पळवून लावतील. मग, घालवायची ना यंदाची सुट्टी पाण्यात?’

विवेक ताम्हणकर

लोककला, साहित्य यांचा स्वतंत्र वारस असलेल्या कोकणाला विशेषत: सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्य़ांना लाभलेला समुद्रकिनारा, हिरव्या माडाच्या बागा, सुंदर खाडय़ा, जलदुर्ग, समुद्रतीरावरील देवालये पाहताना मन भारवून जाते. समुद्रसफरीत होणाऱ्या डॉल्फिन-दर्शनामुळे हा आनंद द्विगुणित होतो. शिवाय इथल्या खास मालवणी जेवणाची चव जिभेवर रेंगाळत राहते, ती वेगळीच! उन्हाळ्याची सुट्टी जवळ आली असताना येथील पर्यटन स्थळे आपल्याला माहीत झाल्यास कोकण पर्यटनाचा मनमुराद आनंद आपल्याला घेता येईल.
सिंधुदुर्गमधील देवगड, मालवण आणि वेंगुर्ला हे तीन तालुके समुद्रकिनाऱ्यावर आहेत. तीनही तालुक्यांची स्वतंत्र ओळख आहे. देवगड व वेंगुर्ला हापूस आंबा उत्पादनासाठी प्रसिद्ध आहेत.
गडदेव
विजयदुर्ग किल्ला व बीच : विजयदुर्ग हे प्रसिद्ध बंदर आहे. येथील समुद्रकिनाऱ्यावर उभा असलेला किल्ला मराठी आरमाराचे केंद्रस्थान म्हणून ओळखला जातो. ८०० वर्षांपूर्वी राजा भोज याने हा किल्ला उभारला. शिवाजी महाराजांनी किल्ल्याची डागडुजी केली. सुमारे सतरा एकर क्षेत्रात हा किल्ला आहे. इथे वीस बुरुज, देवतांची मंदिरे, तोफगोळे पाहायला मिळतात. वास्तुकलेचा सुंदर नमुना असलेला हा किल्ला इतिहासप्रेमींना साद घालतो. किल्ल्यावरून समुद्र न्याहाळताना मन प्रफुल्लित होते. समुद्रातील तटावरून डॉल्फिन-दर्शन घेता येते. बाजूलाच सुंदर विजयदुर्ग बीच आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील तरळे येथून विजयदुर्गला जाणारा ५२ कि. मी.चा मार्ग आहे. वाटेत वाघोटन, पडेल ही गावं लागतात. विजयदुर्ग देवगडवरून २७ कि. मी. अंतरावर आहे.
नजीकचे रेल्वे स्टेशन : वैभववाडी रोड (०२३६७) २३७२५३
राहण्यासाठी : हॉटेल सुरुची (०२३६४) २४५३३५.

देवगड
येथील देवगड किल्ला, बंदर, पवनचक्की व देवगड बीच सौंदर्यात भर पाडत आहेत. इ. स. १७०५ साली कान्होजी आंग्रे यांनी किल्ल्याचे बांधकाम केले. देवगड बंदर वाहतुकीसाठी बंद असून मच्छिमार आपल्या नौका येथे लावतात. सुरक्षित नैसर्गिक बंदर अशी याची ओळख आहे. देशातली पहिली पवनऊर्जा निर्मिती करणारी पवनचक्की येथे पाहता येते. देवगड बीच फारच सुंदर आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील नांदगाव येथून ३८ कि.मी. अंतरावर आहे, तर कणकवलीवरून ५३ कि.  मी. अंतर आहे. वाटेत शिरगाव, तळेबाजार, जामसंडे ही गावे लागतात.
नजीकचे रेल्वेस्टेशन : कणकवली, संपर्क ०२३६७-२३२२४३
राहण्यासाठी : हॉटेल रंगोली ९४२२४३६२७८; हॉटेल ग्रीन व्हिला गेस्ट हाऊस ०२३६४-२६२५४०; हॉटेल पारिजात ०२३६४-२६२३०२.

कुणकेश्वर मंदिर
स्थापत्य कलेचा उत्तम नमुना व समुद्रकिनाऱ्यावरील जागृत देवस्थान अशी कुणकेश्वरची ओळख आहे. महाशिवरात्रीला येथे मोठी जत्रा भरते. हे तीर्थक्षेत्र म्हणून परिचित आहे. देवगडपासून १४ कि. मी. अंतरावर असलेल्या कुणकेश्वरच्या आजूबाजूलाही सुंदर बीच आहेत. येथून ३ कि. मी. अंतरावर तांबळडेग बीच आहे. पांढऱ्याशुभ्र वाळूचा किनारा व माडा-पोफळीच्या बागा येथे पाहायला मिळतात.
राहण्यासाठी : कुणकेश्वर भक्तनिवास ०२३६४-२४८६५०, २४८७५०

मालवण
जवळचे रेल्वे स्थानक : सिंधुदुर्ग, कणकवली- ०२३८७-२३२२४३
राहण्यासाठी : हॉटेल सागरकिनारा ०२३६५-२५२२६४; लॉज स्वस्तिक ०२३६५-२५२४२७;
ओटवणेकर हॉलिडे होम ०२३६५-२५२१८८.

तारकर्ली
समुद्री पर्यटनात या बीचने जागतिक नकाशावर स्थान मिळविले आहे. संपूर्ण किनाऱ्यावर वीजप्रकाशाची व्यवस्था आहे. पर्यटन विकास महामंडळाने तंबू निवासाची व्यवस्था केली आहे. हाऊसबोट व स्पीड बोटीतून येथे समुद्रात सफर करता येते. मालवणपासून ६ कि.मी. अंतर आहे. येथून ४ कि.मी.वर सुंदर माडा-पोफळीच्या बागांतील देवबागपाहता येते. अरबी  समुद्र व कर्ली नदीच्या संगमावरील देवबाग फिरताना फारच सुंदर वाटते.
राहण्याची सुविधा :
MTDC
बांबू हाऊस आणि टेण्ट रिसॉर्ट ०२३६५-२५२३९०;
घर मिठबांवकरांचे ०२३६५-२५२९४१;
सागर दर्शन (देवबाग) ०२३६५-२४८४१४; सुमती रिसॉर्ट ०२३६५-२४८५४३.

स्नॉर्कलिंग, डॉल्फीनदर्शन व हाऊसबोट
मालवणमध्ये एमटीडीसीने स्नॉर्कलिंगची सुविधा उपलब्ध केली आहे. मालवण जेटीजवळ याचे बुकिंग होते. किल्ल्याच्या मागील बाजूला खोल समुद्रातील सौंदर्य पर्यटकांना दाखवले जाते. मालवणमध्ये समुद्रसफर करताना तारकर्ली, देवबाग इथे सायंकाळी डॉल्फीनदर्शन होते; तारकर्लीच्या खाडीत हाऊस बोटिंगचा प्रकल्प एमटीडीसीने सुरू केला आहे. याचे बुकिंग एमटीडीसीच्या तारकर्ली पर्यटन निवास केंद्रात होते.
स्नॉर्कलिंगसाठी संपर्क :
अंतोन फर्नाडिस ९९६०४६८६३८;
यतीन मेयर ९९७५५५६४२८;
एमटीडीसी (०२३६५) २५२३९०.

वेंगुर्ले
भोगवे बीच :
सिंधुदुर्गातील सर्वात सुंदर व डॉल्फिनदर्शनासाठी प्रसिद्ध असलेल्या या बीचवर खाजगी होडय़ांतून समुद्रसफर करता येते. समुद्र पक्ष्यांचे थवे येथे असतात. वेंगुर्लेपासून ३४ कि.मी. तर कुडाळवरून ३० कि.मी.वर भोगवे आहे. वेंगुर्लेवरून म्हापनमार्गे तर कुडाळवरून वालावलमार्गे जायला मार्ग आहे.
जवळचे रेल्वे स्टेशन :
कुडाळ- ०२३६२- २२२६०४
राहण्यासाठी हॉटेल सागरदर्शन : ०२३६६- २६९५७०

सागरेश्वर बीच :
वेंगुर्लेपासून अवघ्या तीन कि.मी. वर हा बीच आहे. येथे सागरेश्वर देवाचे सुंदर मंदिर आहे. येथून वेंगुर्ले बंदराचे विहंगम दृश्य पाहता येते. डॉल्फिनदर्शनासाठी हा किनारा प्रसिद्ध आहे.

निवती बीच :
वेंगुर्लेपासून २८ कि.मी.वर असलेला हा बीच डॉल्फिनदर्शनासाठी प्रसिद्ध आहे. पर्यटकांना समुद्रात २ ते ३ कि.मी. आत नेऊन डॉल्फिनदर्शन घडवले जाते. सर्वात मोठय़ा संख्येने येथे डॉल्फिन असतात. येथे पारंपरिक पद्धतीने केली जाणारी मासेमारी पाहायला मिळते. येथे निवास व न्याहरी योजना केंद्र आहे.
संपर्क : दिगंबर केसरकर ०२३६६-२८०८१२.


रेडी आणि यशवंतगड
रेडी येथील गणपती मंदिर व यशवंतगड- येथील गणपतीमंदिरात दोन हात असलेली गणेशमूर्ती आहे. समुद्रकिनाऱ्याजवळील हे मंदिर धार्मिक पर्यटनस्थळ आहे. येथून जवळच रेडी खाडीमुखाजवळ यशवंतगड आहे. १६व्या शतकात हा किल्ला शिवाजी महाराजांनी विजापूरच्या आदिलशहाकडून जिंकून घेतला. वेंगुर्लेपासून ही ठिकाणे २८ कि.मी. तर सावंतवाडीपासून ३५ कि.मी. वर आहेत. येथे निवासाची व्यवस्था नाही.
नजीकचे रेल्वे स्थानक- सावंतवाडी.

वेंगुर्लेमधील निवास व्यवस्था :
हॉटेल सीव्ह्यूव ०२३६६-२६२४७०;
हॉटेल बांबू ०२३६६- २६२२५१;
खंडे कॉर्नर ०२३६६-२६२४९८
सिंधुदुर्गात आजही व्हर्जिन बीच पाहायला मिळतात. निसर्गसौंदर्य जसेच्या तसे येथे जोपासलेले आहे. परंतु सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा होऊन १० वर्षे उलटल्यानंतरही पायाभूत सुविधा नसल्यामुळे पर्यटकांची गैरसोय होत आहे.

रत्नागिरी
रत्नागिरी जिल्ह्यात फारशी पर्यटनाच्या दृष्टीने डेव्हलपमेंट झाली नसली तरी येथील समुद्रकिनारेही सिंधुदुर्गाप्रमाणेच सुंदर आहेत. गणपतीपुळे हे धार्मिक पर्यटनस्थळ फार वर्षांपासून प्रसिद्ध आहे.

गणपतीपुळे :
प्राचीन कलाकुसरीतील मंदिर व सुंदर मूर्ती असलेले हे ठिकाण फारच सुंदर आहे. लांबच लांब समुद्रकिनारा हे येथील वैशिष्टय़ आहे. वॉटर स्कूटर, मोटर, पॅडल बोट, बोटिंग या सुविधा एमटीडीसीने येथे उपलब्ध करून दिल्या आहेत. मुंबई-गोवा महामार्गावरील हातखांबा येथून रत्नागिरीमार्गे गणपतीपुळेला जायला सुमारे ४० कि.मी.चा मार्ग आहे.
जवळचे स्टेशन : रत्नागिरी.
राहण्याची व्यवस्था : एमटीडीसी तंबू निवास.
संपर्क : ०२३५७- २३५२४८.

आंबुळगड
निसर्गरम्य समुद्रकिनारा असलेले हे एक पर्यटनस्थळ असून रत्नागिरीहून ६० कि.मी. वर आहे. पावसमार्गे- नाटेहून येथे जावे लागते.
राहण्यासाठी :
समुद्र बीच हाऊस ९८९२२०८६८७.

नाटे
रत्नागिरीहून ५५ कि.मी. अंतरावरील या बीचवर पावसमार्गे जावे लागते. या ठिकाणी राहण्याची व जेवणाची सुंदर व्यवस्था आहे. अ‍ॅग्रो टुरीझमची संकल्पना गणेश रानडे यांनी राबवून कोकणी पद्धतीची राहण्याची व्यवस्था समुद्रकिनारीच केली आहे.
संपर्क : गणेश रानडे ९४२२४३३६७६, ०२३५३-२२५५३६.

भगवती किल्ला :
रत्नागिरीहून १ कि.मी.वर समुद्रकिनारी हा किल्ला आहे. किल्ल्यावरून समुद्राचे विहंगम दृश्य न्याहाळता येते. येथे जवळच रत्नागिरी बंदरही आहे.
रत्नागिरी येथून २० कि.मी. वरील आरेवारे पूल प्रसिद्ध ठिकाण आहे. खाडीवरील या पुलानजीकचा किनारा पर्यटकांनी गजबजलेला असतो.
इतिहास म्हणजे काय तर भूतकाळ? की भूतकाळातील आठवणींच्या भोवती घालायचा पिंगा? खरं तर असं अजिबात नाही. विस्मृतीत गेलेल्या घटनांना उजाळा देणं म्हणजेच इतिहासाशी जवळीक साधणं. मराठय़ांच्या इतिहासाची साक्ष देणाऱ्या सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यांमध्ये आज अनेक गड किल्ले वसलेले आहेत. तिथे गेल्यावरच त्या स्थळाचं महत्त्व समजतं किंवा जाणून घेता येते. याच इतिहासाचा एक भाग म्हणजे जलदुर्ग. व्यापार आणि खासकरून सागरी मार्गाने आलेल्या शत्रूवर नजर ठेवण्यासाठी बांधण्यात आलेले हे जलदुर्ग आजही एक वेगळेपण सिद्ध करून आहेत. चला तर मारूया जलदुर्गावर एक फेरफटका.

प्रभा कुडके
आजघडीला महाराष्ट्रात एकूण ७५ जलदुर्ग अस्तित्वात आहेत. खाडी किनाऱ्यालगतचे किल्ले, समुद्रातले व किनाऱ्यालगतचे किल्ले हे सर्व जलदुर्ग या प्रकारात मोडतात. म्हणूनच ठाणे किनारपट्टी आणि कोकण किनारपट्टीवर आपल्याला प्रामुख्याने जलदुर्ग पाहायला मिळतात. या जलदुर्गाची सफर म्हणजे एक आगळाच अनुभव. इथे फक्त काही सागरी नियम पाळावे लागतात. भरती ओहोटीच्या वेळा लक्षात घेऊन काही जलदुर्गामध्ये जावं लागतं. काहींना भेट देण्यासाठी मात्र कुठलेही निसर्गनियम आड येत नाहीत. एका वेगळ्या वाटेवरच्या या सफरीवर बच्चेकंपनींसह गेल्यास त्यांना इतिहास काय होता हे याचि देही याचि डोळा समजावूनही सांगता येईल.

डहाणूचा किल्ला
सध्याच्या घडीला या किल्ल्यावर तहसलीदार कार्यालय थाटलेलं आहे. एकेकाळी या किल्ल्याचा उपयोग व्यापारासाठी मोठय़ा प्रमाणावर केला जायचा. आजही त्या ठिकाणी त्याच्या काही खुणा दिसतात. किल्ल्याची रचना व मांडणी व्यापारदृष्टय़ा पूरक  आहे.
जायचं कसं?
पश्चिम रेल्वेने डहाणू स्टेशन गाठायचं. तिथून बसने १५ मिनिटात किल्यावर पोहोचता येतं .
तारापुरचा किल्ला
या किल्ल्याची मांडणी पाहण्यासारखी आहे. खाडीलगत असलेल्या या किल्ल्याचा वापर मालमत्ता ठेवण्यासाठी केला जायचा. सध्या या किल्ल्याला कुलूप लावलेलं आहे. परंतु आत मात्र जाण्यास काही अडचण येत नाही. किल्ल्याच्या आतमध्ये गोडय़ा पाण्याच्या विहिरी आणि चिकू, नारळ यांच्या बागा पाहायला मिळतील. या किल्ल्याच्या तटबंदीतून शत्रूवर गोळीबार केला जायचा. आजही ते झरोके याठिकाणी पाहता येतील. तटबंदीवरून बिनदिक्कतपणे फिरता येईल इतका सुरक्षित हा किल्ला आहे.
जायचं कसं?
बोईसर या रेल्वे स्थानकावर उतरून किंवा एसटी स्टॅण्डवर उतरून या किल्ल्याकडे जाता येते.

शिरगाव किल्ला
वेगळ्या प्रकारची माडाची बने या किल्ल्यात पाहता येतील. हेच या किल्ल्याचे मुख्य वैशिष्ठय़ आहे. सात पानं असलेली ही माडाची बनं इतरत्र कुठेही आढळत नाहीत. शिवाय किल्ल्याचे घुमटाकृती प्रवेशद्वार, आणि आतील रेखीव बांधकामही पाहण्यासारखे आहे. किल्ल्यावर पाण्याची व्यवस्था नसल्याने आपल्याजवळ मुबलक पाण्याचा साठा असणं गरजेचं आहे.
जायचं कसं?
पश्चिम रेल्वे स्थानकाच्या पालघर या स्थानकावर उतरून तिथून शिरगावला जाण्याकरता बसची व्यवस्था आहे. २० ते २५ मिनिटांचे अंतर पार करून या किल्ल्याजवळ पोहोचु शकतो.

केळवे माहिम
केळवे माहिम हा किल्ला पाणकोट व भुईकोट या दोन्ही प्रकारांमध्ये आहे. भुईकोट किल्ल्यात शितलाई देवीचं मंदिर आहे. येथून बीचवर सहजपणे जाता येतं. या किल्ल्याचा आकार स्टार म्हणजे चांदणीसारखा आहे. किल्लाच्या लगतच सुरूचं बन पसरल्यामुळे पर्यटकांची वर्दळ येथे मोठय़ा प्रमाणावर असते. पोर्तुगीजांनी बांधलेला हा किल्ला उत्तम कलाकृतीचा एक उत्कृष्ट नमुना म्हणूनही ओळखला जातो. पाणकोट किल्ल्यात भरती ओहोटीची वेळ पाहूनच जावं लागतं. पानबुडीसारखा आकार असलेला हा किल्ला ७५ फूट लांब व ४० फूट रूंद असून याची उंची २० फुट आहे. बीचवर किल्ला असल्याने ओहोटीच्या वेळी किल्ल्यात आतमध्ये चालत जाता येतं. आतमध्ये गेल्यावर आठ झरोके पाहायला मिळतील. या झरोक्यामधून दांडा  खाडीवर नजर ठेवली जायची. त्याकरता खास हा किल्ला बांधण्यात आला होता. दांडा खाडीलगत त्या काळात जवळपास १७ किल्ले होते आज त्यातील केवळ हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच किल्ले शिल्लक आहेत.

खांदेरी-उंदेरी
बेट असल्याने या किल्ल्यावर ओहोटीला जाऊ शकत नाही. त्यामुळे भरतीची वेळ कधी आहे हे पाहूनच या किल्ल्यात आपण जाऊ शकतो. थळ मच्छीमार संघटनेच्या ऑफिसमध्ये गेल्यावर तिथून उंदेरीवर जाण्यासाठी बोटीची व्यवस्था केली जाते. किनारा उथळ असल्याने इथे मोठया बोटी आढळत नाही. होडी असल्याने यात केवळ सहा ते सात माणसे बसू शकतात. गोडय़ा पाण्याचा तलाव असल्याने पाण्याची उत्तम व्यवस्था आहे. शिवाय इथले प्रवेशव्दार पाहण्यासारखे आहे. जवळ असलेला थळचा किल्ला सुद्धा पाहता येईल. इथूनच होडी फिरवून आपण खांदेरीला जाऊ शकतो. त्याकाळी मुंबई बंदरातून बाहेर पडणाऱ्या व मुंबई बंदरांत शिरणाऱ्या जहाजांची टेहळणी खांदेरी बेटावरून सोयीस्करपणे करता येत असे. सध्या खांदेरीवर जाण्याकरता लाईट हाऊसची परवानगी घ्यावी लागते. कान्होजी आंग्रे दीपगृह असे याचे नाव असून परवानगी मिळण्यास कुठलीही अडचण येत नाही. वेगळ्या प्रकारचे दगड व अनोखी तटबंदी हे या किल्ल्याचे मुख्य वैशिष्ठय. त्याचबरोबर किल्ल्यावर वेताळाचे मंदिर पाहता येईल. तटावर विराजमान असलेल्या चार तोफा आणि १८ बुरूज इतिहासाची साक्ष देत उभे आहेत. किल्ल्यावर गोडं पाणी असल्याने पाण्याची वानवा नाही. शिवाजी महाराजांनी हा किल्ला बांधला होता. महाराजांनी खांदेरीवर तटबंदी करण्यासाठी पहिला प्रयत्न १६७२ मध्ये केला.
जायचं कसं?
पेणजवळ असणाऱ्या या किल्ल्यांना जाण्यासाठी अलिबागपासून ५ किमी आत जावं लागतं.
कुलाबा किल्ला
अलिबाग शहरापासून पश्चिमेकडे समुद्रात दोन मैलांवर असलेला कुलाबा हा जलदुर्ग आपले लक्ष वेधून घेतो. किल्ल्याच्या नावावरून जिल्ह्याला कुलाबा हे नाव पडले. कुलाबा किल्ला हे कान्होजी आंग्रे यांचे मुख्य आरमारी ठिकाण होतं. एका खडकावर दक्षिणोत्तर पसरलेल्या या किल्ल्याची लांबी ९०० फूट असून रूंदी ३५० फूट आहे. तर याची तटबंदी २५ फूट उंच आहे. तटबंदीसाठी चुन्याचा उपयोग न करता खोबणी करून दगड एकमेकांत जडवलेले आहेत. १७ बुरूज असलेल्या या किल्ल्यात गणेश, सूर्य, हनुमंत, फत्ते, दर्या अशी बुरूजांना नावंही देण्यात आली आहेत. किल्ल्याला लागूनच वेगळी अशी गढी नजरेस पडते  त्याला सर्जेकोट असे म्हटले जायचं. किनाऱ्यावरून हल्ला आला तर येथूनच त्याच्याशी मुकाबला होत असे. सध्या किल्ल्यावर पुरातत्व विभागाचे कार्यालय थाटले आहे. ईशान्येला महाद्वार असून आतील अंगाला लहान दरवाजा आहे. त्याखाली तळघर असून, या तळघरातच पूर्वी धान्य साठवण्यात येत असे. बाजूलाच आंग् ्रयांच्या पाच मजली भव्य वाडय़ाचे आज केवळ नामशेष भाग उरले आहेत. या वाडय़ाला लागूनच बांधलेला हौद आजही बऱ्या स्थितीत आहे. वाडय़ाजवळच पायऱ्यांची आच्छादन असलेली विहिर आहे. पायऱ्या उतरून गेल्यावर ओंजळीने या विहिरीचे पाणी पिता येते. या वाडय़ाजवळच राघोजी आंग्रे यांनी १७५९ साली बांधलेले गणपतीचे देऊळ होते. या देवालयाच्या बाजूला महादेव व मारूती यांची मंदिरे आहेत. जवळच भवानीचे देऊळ व महिषासुर मर्दिनीची मूर्ती आहे. याशिवाय किल्ल्यात कान्होबाचे देऊळ, पद्मावतीची समाधी व पिराचा दरगा आहे.
अर्नाळा
अर्नाळा हे बेट असल्याने तिथे जाण्याकरता केवळ बोट हा एकमेव पर्याय आहे. आजही इथली तटबंदी शाबूत असून, किल्ल्यावर तोफा पाहायला मिळतात. दरगासुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. त्याचबरोबर विविध चित्रपटांचे शूटिंगही याठिकाणी होत असतं. बागा त्याचबरोबर भाजीपाला लावला असल्याने येथे गावकऱ्यांची वर्दळ दिसून येईल. गणेश मंदिर वर असून येथील योगेश नावाचे पुजारी गेल्या ५० वर्षांपासून या किल्ल्यावर राहात आहेत.
जायचं कसं?
विरार या रेल्वे स्थानकावरून आगाशीला जावं त्यानंतर तिथून कोळीवाडय़ात गेल्यास तिथे असलेल्या बोटीने अर्नाळा किल्ल्यावर जाता येतं.

वसईचा किल्ला
चिमाजी आप्पांनी मिळवलेला वसईचा विजय ही घटना मराठय़ांनी भारतातून पोर्तुगीज सत्तेचे उच्चाटन करण्याचा जो संकल्प केला होता, त्यापैकी एक महत्त्वाचा टप्पा होय. म्हणूनच आजही या ऐतिहासिक प्रसंगाची आठवण भारतीयांच्या हृदयास तीव्रतेने जाऊन भिडते. समृद्ध अशी ऐतिहाससिक पाश्र्वभूमी लाभलेला हा किल्ला व्यवस्थितपणे पाहण्यासाठी हातात किमान दोन दिवस हवेत. नाहीतर घाईघाईत हा किल्ला नीटपणे पाहता येणार नाही. वसई किल्ला जिंकल्यावर चिमाजी आप्पांनी किल्ल्यात २७ जुलै १७३९ रोजी मारूतीच्या मूर्तीची स्थापना केली. इतकंच नव्हे तर चिमाजी आप्पांनी विजयासाठी वगोश्वरी देवीस नवस केला होता. त्याप्रमाणे विजय मिळाला. मग पेशवे बाळाजी बाजीराव यांनी वगोश्वरीचे देऊळ बांधले. त्याचबरोबर चिमाजी आप्पांचा पुतळा, वगोश्वरी देवीचं मंदिर, नागेश्वरी मंदिर, बाजारपेठ, तलाव, अनाथालय, भुयारं अशी नानाविध आकर्षणे या किल्ल्यावर असल्याने हे सर्व पाहण्यासाठी व अनुभवण्यासाठी गाठीशी किमान दोन दिवस हवेत.


सिंधुदुर्ग
सिंधुदुर्ग हा शिवाजी महाराजांनी निर्माण केलेला सागरी सत्तेचा श्रीगणेशा होय. मराठय़ांच्या साम्राज्याप्रमाणेच शिवाजी महाराजांनी मराठय़ांच्या सागरी सत्तेचा पाया घातला. सागरी सत्तेस आवश्यक असलेली किनारपट्टीची सुरक्षितता सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, कुलाबा, खांदेरी आदी किल्ले बांधून महाराजांनी निश्चित केली. महाराजांनी उभारलेल्या जलदुर्गाच्या ओळींतील सिंधुदुर्गाचे स्थान व महत्त्व असाधारण असे होते. विशालतेत महान, बांधणीत पक्का, स्वराज्यातील प्रदेशास सोयीने जोडलेला त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे पोर्तुगीजांच्या गोवा कंेद्रावर टेहळणी करण्यास सोयीचा इत्यादी कारणांमुळे सिंधुदुर्ग हे महाराजांच्या सागरी सत्तेचे आद्यकंेद्रच होते. आजही महाराष्ट्रातील जलदुर्गामध्ये सिंधुदुर्ग मानाने मिरवत आहे. असं म्हटलं जातं की, सिंधुदुर्गाच्या बांधणीत शिवाजी महाराजांनी जातीने लक्ष घातले होते. हा जलदुर्ग बांधण्यासाठी मालवणनजीकच्या कुरटे बेटावरील जागा त्यांनी स्वत: पसंत केली. या पसंतीचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे किल्ल्याजवळ जाण्याचा बिकट मार्ग. २५-११-१६६४ रोजी महाराजांनी स्वहस्ते या भूमीमध्ये चिरा बसवला. त्यापूर्वी गणपती पूजन व सागरपूजन देखील करण्यात आले. महाराजांनी किनाऱ्यावर जेथे गणेशपूजन केले ते स्थळ आजही मोरयाचा दगड म्हणून प्रसिद्ध आहे. या खडकावरील गणपती, सूर्य, चंद्र, पादुका, शिवलिंग, नंदी आदी आकृत्या ओळखता येतात. सागराला १०० सुवर्ण होनांची  दक्षिणा यावेळी देण्यात आली होती. या किल्ल्याच्या बांधकामासाठी ५०० पाथरवट, २०० लोहार, १०० गोवेकर पोर्तुगीज व ३ हजार मजूर तीन वर्ष खपत होते. किल्ल्याच्या बांधणीसाठी एक कोटी होन खर्च झाले. पाच खंडी शिसे पायाच्या मजबुतीसाठी वापरण्यात आले होते. पहाऱ्यासाठी किनाऱ्यावर पाच हजार मावळे ठेवण्यात आले होते. सिंधुदुर्गाच्या प्रवेशद्वाराची रचना अशी कौशल्यपूर्ण रीतीने केली आहे की त्या जागी

प्रवेशद्वार असावे अशी इतरांना शंकाही येणार नाही. तटबंदीला ४२ बुरूज असून तटाचा घेर दोन मैल आहे. तटाची उंची ३० फूट असून रूंदी १२ फूट आहे. तटबंदी नागमोडी वळणाची असून कोणत्याही ठिकाणी तटास भिडलेल्या शत्रूंवर तोफा व बंदुका यांचा मारा करता यावा अशी तिची रचना आहे. प्रवेशद्वाराच्या तोंडाशी मारूतीची मूर्ती असून, पश्चिमेकडे टेहेळणी बुरूज आहे. दक्षिणेकडे ५० फूट उंचीचा स्वतंत्र बुरूज आहे. प्रवेशद्वाराच्या उत्तरेकडील बुरूजावर दोन घुमटय़ा असून त्यांत शिवरायांच्या हाताचा व पायाचा असे चुन्यात उमटवलेले ठसे आहेत. या किल्ल्याच्या प्रवेशद्वारावरील लहानशा बेटावर महाराजांनी पऊगड नावाचा कोट उभारून तेथे जहाजे बांधण्याची व्यवस्था केली होती. याखेरीज सिंधुदुर्गाच्या संरक्षणाच्या दृष्टीने राजकोट व सर्जेकोट असे दोन किल्ले उभारले. सर्वात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रात इतरत्र कुठेही आढळणार नाही असे शिवाजी महाराजांचे मंदिर या किल्ल्यात आहे. ४५ फूट लांब व २३ फूट रूंद असलेले हे शिवमंदिर राजाराजमाच्या वेळी बांधण्यात आले होते. या मंदिरातील महाराजांची मूर्ती कोळ्याच्या वेषातील आहे. 
आज सिंधुदुर्ग आपल्या जागी अढळ राहून स्वतंत्र भारतास मोलाचा संकेत करीत आहे. आपल्या उभारणीच्या मुळाशी पुण्य श्लोक शिवाजी महाराजांचा, स्वराज्याचे आरमारी सामथ्र्य वाढवून देशाचे संरक्षण करण्याचा जो उत्कट उदात्त हेतू होता याकडे कधीही दुर्लक्ष होता नये असंच आजही हा जलदुर्ग आपणास बजावून सांगत आहे.

जलदुर्गाचा इतिहास संशोधक
श्रीपाद भोसले हे जलदुर्गाच्या जतनासाठी गेली आठ वर्ष कार्यरत असून विविध मोहिमांमधून ते यासंदर्भात जनजागृती करीत आहेत. खांदेरी, उंदेरी, पद्मदुर्ग, सुवर्णदुर्ग, जंजिरा, सिंधुदुर्ग यासारख्या सागराच्या एन पोटात असलेल्या किल्ल्यांना पोहून प्रदक्षिणा घालण्याचा भारतातील पहिला उपक्रम राबवला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापलेल्या आरमाराचं महत्त्व तरूणांमध्ये रूजविण्यासाठी विविध जलदुर्ग भेटी, जलदुर्ग स्वच्छता अभियान अशा मोहिमा आयोजित केल्या असून, येत्या काही दिवसातच त्यांचे आरमार ए हिंद नावाचे जलदुर्गावरचे पुस्तक प्रकाशित होणार आहे. या पुस्तकामध्ये तब्बल ऐंशी जलदुर्गाची माहिती आपल्याला वाचायला मिळणार आहे.


No comments: