पर्यटन
: चला रत्नागिरीला
- रत्नदूर्ग किल्ला
- श्री भागेश्वर मंदिर
- रत्नागिरी येथील
मत्स्यालय
- पांढऱ्या व काळ्या
वाळूचे समुद्र किनारे
- दीपस्तंभ
- भगवती आणि मिरकरवाडा
बंदर
- श्री कालभैरव मंदिर
- लोकमान्य टिळक
जन्मस्थान
- श्री विठ्ठल मंदिर
- पतितपावन मंदिर
- स्वातंत्र्यवीर
सावरकर स्मारक
- स्वातंत्रवीर सारवरकर
यांची कोठडी
- ऐतिहासीक थिबा पॅलेस
- थिबा पॉईंट
- राजिवडा बंदर
- भाट्ये समुद्र किनारा
- गेट वे टु रत्नागिरी
- प्रादेशिक नारळ
संशोधन केंद्र
- मारुती मंदिर
- रत्नागिरी रेल्वे
स्थानक
- पानवलचा रेल्वे पूल
- दत्त मंदिर चिंचखरी
- सोमेश्वर मंदिर
- बाबरशेख बाबाचा दर्गा, हातीस
- निवळीचा धबधबा
- श्री क्षेत्र पावस
- श्री गणेशगुळे
- पुर्णगड किल्ला
- गावखडी समुद्र किनारा
- गणपतीपुळे परिसर
- गणपतीपुळे पर्यटन
केंद्र
- गणपतीपुळे समुद्र
किनारा
- आरे-वारे समुद्र
किनारा
- प्राचीन कोकण दालन
- केशवसुत स्मारक
- जयगड बंदर
- जयगड किल्ला
- कऱ्हाटेश्वर मंदिर
- दीपस्तंभ-जयगड
- श्री लक्ष्मीकेशव
मंदिर, कोळीसरे
महाराष्ट्र हे देशातल्या विविधतेने नटलेल्या
सर्वांगसुंदर राज्यांपैकी एक आहे. येथे पर्यटनासाठी विलोभनीय स्थळांचा मोठा खजिना
आहे. यापैकी काही महत्त्वाच्या पर्यटन स्थळांची माहिती आम्ही आजपासून आपल्यापर्यंत
पोहोचवित आहोत. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात रत्नागिरी येथे पर्यटन महोत्सवाचे
आयोजन करण्यात येत आहे. त्या निमित्ताने सुरूवात करू या रत्नागिरी जिल्ह्यातील
पर्यटन स्थळांपासूनच....रत्नागिरी तालुका धार्मिक आणि ऐतिहासिक पर्यटनासाठी
प्रसिद्ध आहे. लोकमान्य टिळकांची जन्मभूमी आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांची कर्मभूमी
असलेल्या या परिसरात पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी किमान दोन दिवस तरी हवेतच. दोन
किलोमीटरच्या अंतरात पांढऱ्या आणि काळ्या समुद्राच्या रुपाने सृष्टीचा सुंदर
अविष्कार इथे पहायला मिळतो. रत्नागिरीच्या मुक्कामात अत्यंत रुचकर कोकणी भोजनाची
चव चाखता येते. मुंबई-रत्नागिरी हा कोकण रेल्वेचा प्रवासही तेवढाच आनंद देणारा
आहे. रेल्वेमार्गाने येताना सह्याद्रीच्या कुशीतील सृष्टीसौंदर्य पाहता येते.
रत्नागिरी रेल्वेस्थानक मुख्य शहरापासून 6 किलोमीटर अंतरावर आहे. मुंबईहून वाहनाने
यायचे झाल्यास मुंबई-गोवा महामार्ग हा एकमेव मार्ग आहे. मुंबई-रत्नागिरी अंतर 340 किलोमीटर
आहे. तर पुणे-रत्नागिरी अंतर 320 किलोमीटर आहे. पुण्याहून कुंभार्ली घाटातून
किंवा कराड-मलकापूरमार्गे रत्नागिरीला पोहचता येते.
पर्यटकांचे विशेष आकर्षण
ठरलेला समुद्रकिनाऱ्यावरील रत्नदूर्ग किल्ला हा 'भगवती किल्ला' या नावानेही ओळखला जातो. किल्ला बाराव्या
शतकात बांधला गेल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे. रत्नागिरी शहराच्या पश्चिम बाजूस
एक किलोमीटर अंतरावर असलेला हा किल्ला बालेकिल्ला आणि पेठ किल्ला अशा दोन भागात
आहे. बालेकिल्ल्यात भगवतीदेवीचे सुंदर मंदिर आहे. किल्ल्याच्या दक्षिणेकडे
दीपस्तंभ आहे. बालेकिल्ल्याभोवती नऊ बुरूज असून संपूर्ण किल्ल्यास 29 बुरूज
आहेत. किल्ल्याचा आकार घोड्याच्या खुरासारख दिसतो. किल्ला सुमारे 1211 मीटर
लांब आणि 917 मीटर रुंद असून संपूर्ण परिसर 120 एकराचा
आहे. तीनही बाजूला समुद्र व किल्ल्याच्या एका बाजूला असलेले दिपगृह यामुळे पर्यटक
येथे आकर्षित होतात. बालेकिल्ल्यावरून अथांग समुद्राचे दर्शन घडते. सकाळी 7.30 ते
सायंकाळी 5 या वेळेत पर्यटकांसाठी बालेकिल्ल्याचा दरवाजा उघडला जातो.
श्री
भागेश्वर मंदिर
रत्नदूर्ग किल्ल्याच्या
पायथ्याशी दानशूर कै.भागोजीशेठ कीर यांनी बांधलेले श्री भागेश्वर मंदिर असून
मंदिरातील कलाकुसर प्रेक्षणीय आहे. गाभाऱ्यात शंकराची पिंड असून मंदिराचा सभामंडप
भव्य आहे. या मंदिराच्या खांबांवर सुंदर निसर्गचित्रे कोरलेली असून मंदिराच्या
छतावर ध्यानस्थ साधूंचे पुतळे बसविले आहेत. मंदिराचे बांधकाम स्थापत्यशास्त्राचा
एक उत्कृष्ट नमूनाच आहे. परिसरातील रम्य वातावरणामुळे मंदिराचे सौंदर्य खुलुन
दिसते. मंदिर परिसरात भक्तनिवासाची सुविधा आहे. (संपर्क-02352-233224)
रत्नागिरी
येथील मत्स्यालय
रत्नागिरी तालुक्यातील शिरगाव येथे
डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाच्या अधिपत्याखालील मत्स्य महाविद्यालयाचे
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र रत्नदूर्ग किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या
पेठकिल्ला भागात आहे. घोडामासा, कोंबडा मासा, ट्रिगर मासा, समुद्री कासव, समुद्री काकडी, तारामासा, शेवंड, सामुद्रीसाप, ऑक्टोपस अशा असंख्य जीवंत माशांच्या
जातींसोबतच सुमारे 1300 समुद्री जीवांचे नमुने असलेले संग्रहालय पर्यटकांचे आकर्षण
स्थळ ठरले आहे. अडीचशेपेक्षा जास्त शिंपल्यांचे अप्रतिम प्रकार येथे ठेवण्यात आले
आहेत. चकीत करणारा 55 फूट लांबीचा सुमारे 5 हजार किलोग्रॅम वजनाचा देवमाशाचा भीमकाय
सांगाडा येथे पहावयास मिळतो.
पांढऱ्या
व काळ्या वाळूचे समुद्र किनारे
रत्नदूर्गाच्या पायथ्याशी
दक्षिणेच्या बाजूला जुने मांडवी बंदर म्हणजेच 'गेटवे ऑफ रत्नागिरी'आहे. येथील समुद्र काळ्या
रंगाच्या वाळूचा असल्यामुळे त्याला 'काळा समुद्र' म्हणतात. तर उत्तरेकडे मिरकरवाडा बंदराचा
किनारा पांढऱ्या वाळूचा असल्याने समुद्राचा हा भाग 'पांढरा समुद्र' नावाने ओळखला जातो. हे दोन्ही किनारे रमणीय
असून तेथे सांयकाळी भटकंती करण्यासाठी अबालवृद्धांची गर्दी असते. रत्नदुर्ग
किल्ल्याकडे जाताना उजवीकडील पायवाटेने पेठकिल्ल्यावरील शेवटच्या बुरुजाकडे
गेल्यास हे विलोभनीय सौंदर्य पाहता येते.
दीपस्तंभ
पेठकिल्ल्यावर जाणाऱ्या डावीकडील वाटेने
गेल्यास दिपस्तंभापर्यंत पोहोचता येते. या भागात शेवटच्या स्थानापर्यंत वाहन
नेण्याची सुविधा आहे. या दिपस्तंभाची उभारणी 1867 मध्ये करण्यात आली. त्याचे नुतनीकरण 1961 मध्ये
करण्यात आले आहे. सायंकाळी 4 ते 5 या वेळेत दिपस्तंभवरून मांडवी जेट्टी आणि भाट्येचा
विस्तारलेल्या समुद्राचे सौंदर्य न्याहाळता येते.
भगवती आणि मिरकरवाडा बंदर
रत्नागिरी येथे रत्नदुर्ग किल्ल्याच्या
पायथ्याशी भगवती बंदर प्रकल्प उभारण्यात आला आहे. याच बंदराच्या बाजूला मिरकरवाडा
येथे मच्छिमार बंदर प्रकल्प उभारण्यात आला आहे. बंदरातून मासळीची चढउतार केली
जाते. याच परिसरात जहाज बांधणी कारखाना आहे. भगवती बंदराजवळ उभे राहून किल्ल्याचे
सौंदर्य न्याहाळता येते.
श्री
कालभैरव मंदिर
किल्ल्यावरून परत येताना खालच्या आळीत श्री
कालभैरवाचे मंदिर आहे. कान्होजी आंग्रे यांचे पुत्र सेखोजी आंग्रे यांच्या काळात
हे मंदिर बांधल्याचे सांगितले जाते. मंदिराचा परिसर अत्यंत रम्य आहे. किल्ल्यावरून
उतरल्यावर निवांतपणे काही क्षणे येथे घालविता येतात.
लोकमान्य
टिळक जन्मस्थान
'स्वराज्य हा माझा जन्मसिध्द हक्क आहे आणि तो
मी मिळविणारच' अशी गर्जना करणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जन्मभूमि
रत्नागिरी. शहरातील टिळक आळीतील इंदिराबाई गोरे यांच्या वाड्यात लोकमान्य टिळकांचा
23 जुलै 1856 रोजी जन्म झाला व ते 10 वर्ष
म्हणजे 1866 पर्यंत तेथे राहीले. ही वास्तू पुरातत्व खात्याने जतन केली
असून तिला संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले आहे. दरवर्षी याठिकाणी टिळक
जन्मोत्सव साजरा करण्यात येतो. सोमवार वगळता अन्य दिवशी हे स्मारक पाहण्यासाठी
खुले असते.
श्री
विठ्ठल मंदिर
राजस्थानमधून आलेल्या गुजर कुटुंबियांनी
बांधलेले हे मंदिर शहर परिसरातच आहे. मुख्य मंदिराभोवती इतर देवदेवतांची मंदिरे
आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी पतितपावन मंदिर उभारण्यापूर्वी जनसामान्यांना या
मंदिरात प्रवेश मिळावा म्हणून लढा दिला होता. या संघर्षामुळे बहुजन समाजाच्या
नागरिकांना सभामंडपापर्यंत प्रवेश देण्यात आला होता.
पतितपावन
मंदिर
लोकमान्य टिळक जन्मस्थानापासून जवळच असलेल्या
स्वातंत्र्यलक्ष्मी चौकाजवळ स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर यांनी दानशूर भागोजीशेठ
किर यांच्या सहकार्याने बांधलेले श्री पतितपावन मंदिर आहे. विठ्ठल मंदिरातील
सत्याग्रहाचा अनुभव लक्षात घेऊन सामाजिक समतेचा उद्घोष करण्यासाठी स्वतंत्र मंदिर
बांधण्याचा निश्चय स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी केला. दानशूर कीर यांच्या मदतीने 3 लाख
रुपये खर्चुन हे मंदिर त्यांनी बांधले. बहुजन समाजासाठी हे मंदिर खुले करण्यात आले
आणि त्यांना पुजा-प्रार्थनेचा समान अधिकार देण्यात आला.
स्वातंत्र्यवीर
सावरकर स्मारक
पतितपावन मंदिर परिसरात स्वा.सावरकर यांचे
स्मारक उभारण्यात आले आहे. या वास्तूच्या पहिल्या मजल्यावर क्रांतिकारकांच्या
देशकार्याची माहिती देणाऱ्या छायाचित्रांचे 'गाथा बलिदानाची' हे
प्रदर्शन आहे. स्वा. सावरकारांची काठी, त्यांचा चष्मा, त्यांनी लंडनहून पाठविलेली पिस्तुले, त्यांच्या
जवळ असणारा जांबिया, व्यायामाचे मुद्गल आदी वस्तू या दालनात प्रदर्शित केल्या
आहेत. मार्सेलीस बंदरावर ज्या बोटीतून समुद्रात ऐतिहासिक उडी घेतली त्या बोटीची
प्रतिकृती इथे ठेवण्यात आली आहे. तळमजल्यावरील सभागृहात पर्यटक आणि
विद्यार्थ्यांसाठी रत्नागिरीतील थोर नररत्ने आणि पर्यटन स्थळांची माहिती देणारा
माहितीपट दाखविला जातो. स्मारकाला सकाळी 10 ते 12 आणि सायंकाळी 4 ते 6 या वेळेत भेट देता येते.
स्वातंत्रवीर सारवरकर यांची
कोठडी
स्वातंत्रवीर वि.दा.सावरकर यांना ब्रिटीशानी
रत्नागिरी येथील विशेष कारागृहात 16 मे 1921 ते 3 सप्टेंबर 1923 कालावधीत बंदिवासात ठेवले होते. कारागृहातील
ज्या खोलीत सावरकरांना ठेवण्यात आले होते ती कोठडी स्वातंत्रविरांचे स्मारक म्हणून
जतन करुन ठेवण्यात आली आहे. या कोठडीत स्वातंत्रवीरांची स्मृति म्हणून भव्य
तैलचित्र आणि त्यांच्या गळ्यात अडकविण्यात आलेले साखळदंड, बेड्या, लोहगोळे
इत्यादी वस्तू संग्रहीत करुन ठेवण्यात आल्या आहेत. सेनापती बापट यांनाही याच
कारागृहात 24 नोव्हेंबर 1931 ते 31 डिसेंबर 1935 या कालावधीत स्थानबद्ध करण्यात आले होते.
शहरातील जयस्तंभ चौकापासून जवळच असलेल्या विशेष कारागृहात ही कोठडी आहे. कारागृह
व्यवस्थापनाच्या पूर्वपरवानगीने या कोठडीस दुपारनंतर भेट देता येते.
ऐतिहासीक
थिबा पॅलेस
रत्नागिरी शहरातील 'थिबा राजवाडा' ही
भव्य ऐतिहासीक वास्तू पर्यटकांसाठी मोठे आकर्षण आहे. इंग्रजानी ब्रह्मदेशाच्या
थिबा राजाला 1885 साली स्थानबद्ध करुन रत्नागिरीत आणले. त्याच्यासाठी सन 1910 साली
हा तीन मजली पॅलेस इंग्रज सरकारने बांधला. या पॅलेसमध्ये थिबा राजा सन 1911 मध्ये
राहण्यासाठी गेला. राजवाड्याच्या गच्चीवरून समुद्रकिनाऱ्याचा निसर्गरम्य परिसर
दिसतो. मागच्या बाजूस राजाने ब्रह्मदेशातून आणलेली बुद्धाची मुर्ती आहे. याच भागात
पुरातन वस्तुसंग्रहालय आहे. तळमजल्यावर प्राचीन मुर्त्या आणि वरच्या मजल्यावरील
चित्रप्रदर्शन कलाप्रेमींसाठी विशेष आकर्षण आहे. सोमवार सोडून इतर दिवस हा पॅलेस
पर्यटकांसाठी सायंकाळी 5 वाजेपर्यंत खुला असतो.
थिबा
पॉईंट
थिबा पॅलेस परिसरात आकाशवाणी केंद्राला लागून
असलेलेले स्थान 'थिबा पॉईंट' नावाने ओळखले जाते. या स्थानाजवळच जिजामाता
उद्यानाची निर्मिती करण्यात आली आहे. या उद्यानातील टॉवरवरून भाट्ये खाडी आणि
राजीवडा बंदराचे नयनरम्य दृष्य दिसते. अथांग सागराच्या पार्श्वभूमीवर दिसणारे
सुर्यास्ताचे विहंगम दृष्य नजरेत साठविण्यासाठी सायंकाळी या उद्यानात पर्यटकांची
गर्दी होते. उद्यानात लहानमुलांच्या मनोरंजनाची अनेक साधने आहेत.
राजिवडा
बंदर
रत्नागिरी शहराला लागूनच असलेल्या भाट्ये
खाडीवर राजिवडा बंदर आहे. राजिवडा खाडीत होडीत बसून नौकानयनाची हौस भागविण्यासाठी
अनेक पर्यटक येत असतात. खाडीत रांगेने उभ्या असलेल्या बोटींचे सौंदर्य कॅमेऱ्यात
टिपण्यासारखे असते.
भाट्ये
समुद्र किनारा
रत्नागिरी शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर
भाट्ये येथे दाट सुरुबनाची किनार असलेला सुंदर समुद्र किनारा आहे. किनाऱ्यावर
समुद्रस्नान करणाऱ्या पर्यटकांसाठी खाजगी सुविधादेखील आहे. समुद्राच्या
सान्निध्यात दिवस घालविण्यासाठी या भागात रिसॉर्ट्स आहेत. परिसराच्या सौदर्यामुळे
येथे चित्रपटांचे चित्रीकरणही होते. विस्तारलेल्या समुद्र किनाऱ्यावरील सायंकाळची
भटकंती आणि सुर्यास्ताचे मनोहारी दृष्य तेवढेच आनंददायी असते.
गेट वे
टु रत्नागिरी
शहरापासून 1.5 किलोमीटर अंतरावर मांडवी समुद्र किनारा आहे.
येथे जेट्टी बांधण्यात आली असून पूर्वी वाहतूकीसाठी या जेट्टीचा वापर होत असे.
जेट्टीची उभारणी लॅन्डींग व हार्फेज फी फंडातून 1934 मध्ये करण्यात आली आहे. जेट्टीच्या सुरुवातीस
मोठी कमान उभारण्यात आली आहे. 'रत्नागिरीचे प्रवेशद्वार' म्हणून
ही कमान ओळखली जाते. समुद्र किनाऱ्यावरील चौपाटीवर सायंकाळी पर्यटकांची गर्दी
असते. जेट्टी जवळील खडकाळ भागात जाण्याचा मोह मात्र पर्यटकांनी टाळावा.
प्रादेशिक
नारळ संशोधन केंद्र
डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषि
विद्यापीठांतर्गत भाट्ये येथे प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र आहे. 55 वर्षातील
यशस्वी कामगिरीच्या बळावर या केंद्राला राष्ट्रीय पुरस्कारदेखील मिळाला आहे.
केंद्रात नारळाच्या 40 जाती पाहायला मिळतात. क्वचितच आढळणारे पिवळे, नारंगी
रंगाचे नारळ या केंद्राच्या परिसरात मोठ्या संख्येने आहेत. अधिक उत्पन्न देणारी 'लाखी बाग' हे
या केंद्रातील प्रमुख आकर्षण आहे. मसाल्याच्या पदार्थंच्या विविध जाती इथे पाहायला
मिळतात. पूर्व परवानगीने परिसराची भटकंती करता येते.
रत्नागिरी शहराची मुख्य खूण असणाऱ्या या
मंदिराची स्थापना रामदास स्वामींनी केल्याचे सांगितले जाते. मंदिरात वर्षभरात
विविध उत्सव साजरे केले जातात. मुंबई-पुण्याकडे जाणाऱ्या खाजगी बसेस याच परिसरात
रात्री थांबतात. रत्नागिरीतील प्रवेश करताना किंवा बाहेबर पडताना मुख्य खूण म्हणून
हा चौक लक्षात राहतो.
शहरापासून सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या यास
रेल्वे स्थानकाला आयएसओ 9000 प्रमाणपत्र मिळालेले आहे. रेल्वेस्थानकाचा परिसरही अत्यंत
सुंदर आहे. अशियातील सर्वात लांब असणारा करबुडे बोगदा रत्नागिरीजवळ आहे. या
बोगद्याची लांबी 6.5 किलोमीटर आहे. मुंबई-आग्रा महामार्गावरील निवळी फाट्यापासून
गणपतीपुळेकडे जाताना सात किलोमीटर अंतरावर उजवीकडे लाजूळ गावाकडे जाणारा रस्ता
आहे. लाजूळ गावाच्या अलिकडे उजवीकडे असलेल्या कच्च्या वाटेने बोगद्यापर्यंत जाता
येते. या ठिकाणी गेल्यावर हे भव्य आणि अचंभित करणारे कार्य करण्यासाठी परिश्रम
घेतलेल्यांची निश्चितपणे आठवण होते. म्हणूनच कोकण रेल्वेमार्ग तयार करण्याचे
आव्हान पेलताना दुर्घटनेत आपला प्राण गमविणाऱ्या कामगारांच्या स्मृती जपण्यासाठी
रेल्वे स्थानकासमोरच 'श्रमशक्ती स्मारक' उभारण्यात आले आहे. पावसाळ्यात कोकण रेल्वेने
प्रवास करताना उक्शी स्थानकाजवळ नयनरम्य धबधब्याचे दर्शन घडते.
हा अशियातील सर्वात उंच रेल्वे पूल आहे.
पुलाची उंची 65 मीटर असून ही भव्य निर्मिती करणाऱ्या हातांविषयी मनात
अभिमानाची आणि कृतज्ञतेची भावना निर्माण होते. पूलाच्या सभोवतालचा परिसरही खूप
सुंदर असून जंगलातील भटकंतीचा आनंदही या भागात घेता येतो.रत्नागिरी शहरापासून 9 किलोमीटर
अंतरावर पानवल गावाकडे जाणारा रस्ता आहे. या रस्त्यावर कच्च्या रस्त्याने पुढे
गेल्यास 3 किलोमीटर अंतरावर डाव्याबाजूस पानवलचा रेल्वे पूल आहे.
चिंचखरी दत्तमंदिराकडे जाताना खाडी जवळील रस्त्याने पोमेंडीमार्गेदेखील पानवल येथे
जाता येते. हे अंतर रत्नागिरीपासून 18 किलोमाीटर आहे. हा संपूर्ण डांबरी रस्ता आहे.
रत्नागिरी शहरातून नाचणेमार्गे दहा किलोमीटर
अंतरावर चिंचखरी येथे निसर्गरम्य परिसरात उभारलेले दत्त मंदिर आहे. गजानान महाराज
बोरकर यांचे चिंचखरी हे जन्मगाव. या ठिकाणी तपोवनाची निर्मिती करून त्यांनी दत्त
मंदिर उभारले आहे. मंदिराच्या बाजूला असलेला निर्मळ पाण्याचा प्रवाह आणि परिसरातील
दाट वनराई यामुळे मंदिरात प्रवेश करताक्षणी प्रसन्न वाटते. श्री गुरु दत्ताची
संगमरवरी मुर्ती तेवढीच देखणी आहे. राजीवाडा बंदरापासून बोटीनेदेखील चिंचखरी येथे
जाण्याची सोय आहे.
चिंचखरीच्या अलिकडे डाव्या बाजूस दाट
वनराईतून सोमेश्वरकडे जाणारा रस्ता आहे. हे गाव 12 शतकातील असल्याचे सांगितले जाते. गावाच्या
मध्यभागी सोमेश्वराचे पुरातन मंदिर आहे. चार भागात विभागलेल्या मंदिराची वास्तू
स्थापत्यकलेचा सुंदर नमुना आहे. दगडी तटबंदीच्या मधोमध सुंदर कौलारू मंदिर उभारले
आहे.
रत्नागिरीपासून 18 किलोमीटर
अंतरावर काजळीनदीच्या तीरावर हातीस गाव वसलेले आहे. गावात बाबरशेख बाबांनी गावातील
लोकांना भक्तीमार्ग दाखविला. त्यांच्या महानिर्वाणानंतर गावातील जनता हिंदू
असल्याने ग्रामस्थांनी इब्राहिमपट्टण येथील मुस्लिम बांधवांच्या मदतीने दफन विधी
पार पाडला. तेव्हापासून दोन्ही गावातील मंडळी माघ पौर्णिमेला बाबांचा ऊर्स साजरा
करतात. हा सोहळा हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक आहे. उर्समधील शस्त्रास्त्रांचे खेळ
आणि गावातील ढोल पथकाचे खेळ डोळ्याचे पारणे फेडतात.
मुंबई-गोवा महामार्गाने रत्नागिरीकडे जाताना
संगमेश्वरपासून 20 किलोमीटर अंतरावर रस्त्याच्या कडेला उभे राहून निवळीच्या
धबधब्याचे दर्शन घडते. उंच डोंगरावरील दाट झाडीतून खाली कोसळणाऱ्या धबधब्याचे
सौंदर्य पाहणे हा आनंददायी अनुभव असतो. थोडे पुढे गेल्यावर खाली जाणाऱ्या पायऱ्या
आहेत. या मार्गाने खाली जावून धबधब्यात चिंब होण्याची मज्जा लुटता येते.
पावसाळ्यात मात्र दूरूनच सौंदर्य न्याहाळलेले अधिक चांगले. रत्नागिरी-निवळी अंतर 18 किलोमीटर
आहे.
रत्नागिरी शहरापासून 16 किलोमीटर
अंतरावर स्वामी स्वरुपानंद यांचे जन्मगाव पावस आहे. ब्रिटीश सत्तेविरुद्ध असहकार
आंदोलनात भाग घेताना स्वामीजी पुण्यातील येरवाडा तुरुंगात होते. तेथेच त्यांनी
साधना केली. कारागृहाती सहकाऱ्यांनी त्यांना 'स्वामी' असे संबोधण्यास सुरुवात केली. स्वामींजी 15 ऑगस्ट
1974 रोजी समाधिस्त झाले. त्याच जागी भव्य मंदिर उभारण्यात आले
आहे. मंदिरातील शांतता, पावित्र्य आणि रम्य परिसर पर्यटकांना आकर्षित करतो. मंदिर
परिसरात भक्तनिवास व प्रसादाची सोय आहे. पावसचा पूल ओलांडून गेल्यावर देसाई
बंधूंच्या निवासस्थानातील ज्या खोलीत स्वामीजींचे वास्तव्य होते ती खोली पाहायला
मिळते. त्यांच्या नित्य वापरातील वस्तू याठिकाणी जतन करून ठेवण्यात आल्या आहेत.
स्वामीजींची ग्रंथसंपदा मंदिर परिसरात अल्पदरात उपलब्ध करून देण्यात आली आहे.
पावसपासून पाच किलोमीटर अंतरावर गणेशगुळे
आहे. या गावात गणपतीचे प्रसिद्ध देवालय आहे. 'गुळ्याचा गणपती पुळ्याला गेला' अशी
म्हण या भागात प्रचलित आहे. गणेश मंदिर 400 वर्ष जुने असून समोरच्या भागात खोल दरीतील
हिरवेगार सौंदर्य नजरेत भरते. हा गणपती 'गलबतवाल्यांचा गणपती' म्हणूनही
प्रसिद्ध आहे. मंदिराच्या मागच्या बाजूस रस्त्याच्या कडेला पारंपरिक कोकणी
पद्धतीची विहीर आहे. आयाताकृती अरुंद विहीरीला खालेपर्यंत पायऱ्या करण्यात आल्या
आहेत. गणेशगुळेचा समुद्र किनारा गर्द झाडींनी व्यापलेला आहे. उन्हाळ्यात फणसाच्या
सुगंधात किनाऱ्याकडे जाताना आल्हाददायक अनुभव येतो.
पावसपासून 7 किलोमीटर अंतरावर पुर्णगड किल्ला आहे.
मुचकुंदी नदीच्या मुखाशी समुद्राच्या 22 एकर क्षेत्रावर हा किल्ला उभारलेला आहे.
किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर गणेशाचे शिल्प कोरलेले आहे. किल्ल्याची तटबंदी
जांभ्या दगडाची असून मजबूत अवस्थेत आहे. अठराव्या शतकात किल्ल्याची उभारणी
पेशव्यांच्या इच्छेनुसार करण्यात आली. व्यापारी दृष्टीकोन लक्षात घेऊन किल्ल्याची
उभारणी केल्याच्या खुणा परिसरात आढळतात. पुर्णगडपासून राजापूर तालुक्यातील कशेळीचा
कनकादित्य, आडिवरेची महालक्ष्मी आणि देवीहसोळच्या आर्यदुर्गेला भेट
देता येते.
रत्नागिरीहून पावसमार्गे पुर्णगडच्या
खाडीपूलावरून पुढे गेल्यावर उजव्या बाजूस एका रेषेत दाट सुरुबन दृष्टीपथास पडते.
सुरुंची झाडे एका रेषेत असल्याने झाडांमधून समुद्राचे अप्रतिम दृष्य दिसते. या
सुरुबनातील भटकंती प्रवासातील थकवा घालविणारी असते. एक किलोमीटर लांबीच्या या
किनाऱ्यावर कुटुंबासह भटकंती करतांना सुरुबनात दुपारचे भोजन घेऊन निसर्ग सहलीचा
आांद लुटता येतो. पावस गावखडी अंतर 9 किलोमीटर आहे.
गणपतीपुळे परिसर
श्री क्षेत्र गणपतीपुळे : श्री क्षेत्र गणपतीपुळे रत्नागिरी जिल्ह्यातील महत्वाचे पर्यटन केंद्र म्हणून नावारुपास आले आहे. सागरकिनाऱ्यावरील रम्य परिसरात असलेले श्री गजाननाचे मंदिर आणि समोर दिसणारा अथांग समुद्र पर्यटकांसाठी विशेष आकर्षण आहे. अंगारकी संकष्टी आणि माघ महिन्यातील गणेशचतुर्थीला येथे मोठी यात्रा भरते. परिसरातील उद्यान आणि मंदिर परिसराच्या सुशोभिकरणामुळे हे देवस्थान भाविक आणि पर्यटकांचे आकर्षण स्थळ बनले आहे. मंदिराभोवती एक किलोमीटरचा प्रदक्षिणा मार्ग आहे. मंदिर परिसरात अनेक चांगली हॉटेल्स, निवास-न्याहरी योजने अंतर्गत असलेली घरगुती निवास व्यवस्था मुबलक प्रमाणात आहे. देवस्थानाच्यावतीनेदेखील या ठिकाणी निवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. (संपर्क-02357-235223, 235224) मुंबई-गोवा महामार्गावर निवळी फाट्यापासून हे स्थान 35 किलोमीटर अंतरावर आहे. रत्नागिरी-गणपतीपुळे अंतर 25 किलोमीटर आहे.
श्री क्षेत्र गणपतीपुळे : श्री क्षेत्र गणपतीपुळे रत्नागिरी जिल्ह्यातील महत्वाचे पर्यटन केंद्र म्हणून नावारुपास आले आहे. सागरकिनाऱ्यावरील रम्य परिसरात असलेले श्री गजाननाचे मंदिर आणि समोर दिसणारा अथांग समुद्र पर्यटकांसाठी विशेष आकर्षण आहे. अंगारकी संकष्टी आणि माघ महिन्यातील गणेशचतुर्थीला येथे मोठी यात्रा भरते. परिसरातील उद्यान आणि मंदिर परिसराच्या सुशोभिकरणामुळे हे देवस्थान भाविक आणि पर्यटकांचे आकर्षण स्थळ बनले आहे. मंदिराभोवती एक किलोमीटरचा प्रदक्षिणा मार्ग आहे. मंदिर परिसरात अनेक चांगली हॉटेल्स, निवास-न्याहरी योजने अंतर्गत असलेली घरगुती निवास व्यवस्था मुबलक प्रमाणात आहे. देवस्थानाच्यावतीनेदेखील या ठिकाणी निवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. (संपर्क-02357-235223, 235224) मुंबई-गोवा महामार्गावर निवळी फाट्यापासून हे स्थान 35 किलोमीटर अंतरावर आहे. रत्नागिरी-गणपतीपुळे अंतर 25 किलोमीटर आहे.
श्रीक्षेत्र गणपतीपुळे देवस्थानमुळे
नावारुपाला आलेले महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे गणपतीपुळे पर्यटन केंद्र आता
आंतरराष्ट्रीय स्तराचे पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्याच्या दृष्टीने प्रयत्न
सुरू आहेत. या केंद्रात पर्यटकांसाठी 73 कक्ष, 35 तंबू निवास व 12 कोकणी हट्स बांधण्यात आलेल्या आहेत. परदेशी
पर्यटकांना कोकणी हट्स आकर्षून घेतात. या ठिकाणच्या जलक्रीडा केंद्रात
पर्यटकांसाठी नौका विहाराची सुविधा उपलब्ध आहे. नारळाच्या दाट झाडीतील समुद्र
किनारचे वास्तव्य पर्यटकांना सुखद अनुभव देणारे असते. (संपर्क-02357-235248/235061/235062, फॅक्स-235328)
श्री
गणेश मंदिराच्या समोरच्या बाजूस विस्तारलेला पांढऱ्या वाळूचा समुद्र किनारा आहे.
स्वच्छ किनाऱ्यावर समुद्रस्नानाचा मनमुराद आनंद लुटता येतो. मात्र समुद्रात
जाण्यापूर्वी स्थानिकांकडून माहिती अवश्य घ्यावी. किनाऱ्यावर गार वाऱ्याची झुळुक
अंगावर घेत आनंद लुटण्यासाठी विविध प्रकारचे क्रीडा साहित्य भाड्याने मिळण्याची
सुविधा आहे. सरबताची वेगवेगळी चव येथे चाखायला मिळते. किनाऱ्यावर पॅरासिलींगचा
रोमांचीत करणारा अनुभव पावसाळा संपल्यावर घेता येतो. अथांग समुद्राच्या
पार्श्वभूमीवर सुर्यास्ताचे मनोहारी दृष्य कोकणची सफर स्मरणीय करणारे असते.
गणपतीपुळ्याला जाताना रत्नागिरीपासून 13 किलोमीटर
अंतरावर आरे आणि वारे गावाच्या सीमेवर डोंगरावरून समुद्राचे मोहक दृष्य पाहता येते.
येणारे पर्यटक समुद्राचे सौंदर्य कॅमेऱ्यात बंदिस्त करण्यासाठी येथे आवर्जुन
थांबतात. सुरुच्या वनाने नटलेला सुंदर किनारा पर्यटकांना विश्रांतीसाठी आकर्षित
करणारा असाच आहे. या भागात मात्र समुद्रात उतरताना फार काळजी घ्यावी लागते. या
ठिकाणाहून थोडे पुढे गेल्यावर उंचावरून अथांग पसरलेले निळेशार पाणी दिसते. म्हणून
सागराचा हा भाग 'निळा समुद्र' नावाने ओळखला जातो.
गणपतीपुळे गावात मंदिरापासून एक किलोमीटर
अंतरावर असलेले 'प्राचीन कोकण' आवर्जुन भेट द्यावी असेच आहे. कोकणातील पाचशे
वर्षापूर्वीची संस्कृती या दालनाच्या माध्यमातून डोंगरावरील भागात प्रदर्शित केली
आहे. प्रदर्शनाची माहिती देण्यासाठी सोबत 'गाईड'ची सुविधा उपलब्ध करून देण्यात येते. नक्षत्र
उद्यानातील विविध वनस्पतींची माहिती घेत या दालनाची सफर घडते. शिल्पकलेच्या
माध्यमातून कोकणी संस्कृतीचे हे अप्रतिम रुप पाहतांना पर्यटक थक्क होतात. शिवाय
पर्यटकांना कोकणातील वैशिष्ट्य आठवणीच्या रुपात घरी नेता यावे यासाठी वरच्या भागात
खास विक्रीचे दालन आहे. डोंगराच्या अगदी वरच्या भागातील मचाणावरून दिसणारे
गणपतीपुळेचे सौंदर्य विलोभनीय असते. तासाभराच्या या सफरीत विविधरंगी पक्ष्यांचे
दर्शनही घडते. तेथून परततांना उकडीचे मोदक, भाजणीचे थालीपीठ, अळूवडी, झुणका
भाकर, कोकम सरबत अशी विविध प्रकारची चव चाखण्याची सोय या ठिकाणी
केलेली असते. या दालनात कोकणातील जलदुर्गांच्या प्रतिकृतीची भर पडल्याने हे दालन
अधिक समृद्ध झाले आहे.
गणपतीपूळ्यापासून अवघ्या 2 कि.मी.
अंतरावर मालगुंड या गावी आधुनिक मराठी कवितेचे जनक कवी केशवसुत यांचे स्मारक कोकण
मराठी साहित्य परिषदेच्यावतीने उभारण्यात आले आहे. एखाद्या कवीचे अशा तऱ्हेचे
उभारलेले हे सध्यातरी एकमेव स्मारक आहे. या वास्तूत ग्रंथालय, अभ्यासिका, वाचनालय
असे विविध कक्ष असून स्वतंत्र कक्षात अनेक गाजलेल्या कविता वाचायला मिळतात.
त्यातील काही हस्तलिखित स्वरुपात आहेत. मराठीतील अनेक प्रतिभावंतांची छायाचित्रासह
माहिती या ठिकाणीवाचायला मिळते. शेजारीच कवी केशवसुतांचे मूळ घर स्मारक म्हणून जतन
करण्यात आलेले असून तेथे संग्रह म्हणून कोकणातील पुरातन वस्तू ठेवण्यात आल्या
आहेत.
गणपतीपुळे येथून दहा किलोमीटर अंतरावर जयगड
बंदर आहे. व्यापाराच्यादृष्टीने पूर्वीपासूनच या बंदराचा उपयोग केला जात आहे.
बंदरावरून बोट भाड्याने घेऊन जयगडच्या परिसराचे सौंदर्य न्याहाळता येते. बंदरावर
मच्छिमार बोटींची ये-जा सुरु असते. जयगडच्या खाडीतून तवसाळला जाण्यासाठी फेरीबोटची
माफक दरात व्यवस्था आहे. फेरीबोटने जाताना नव्याने बांधणी करण्यात येणारे जयगड
बंदर आणि जिंदाल समुहाचा औष्णीक ऊर्जा प्रकल्प समोर दिसतो. समुद्र सफरीचा आनंद
घेताना मात्र किनाऱ्यावरील खडकांवर आदळणाऱ्या लाटांचे रौद्र रुप लक्षात घेता या
भागात समुद्र किनाऱ्यावरील पायी भटकंतीचा मोह टाळणेच योग्य आहे.
शास्त्री नदीच्या खाडीत उभारण्यात आलेला हा
किल्ला विजापूरकरांनी बांधला. या किल्ल्याचे ऐतिहासिक महत्व सांगणारे 16 व्या
शतकातील संदर्भ उपलब्ध आहेत. गावाच्या उत्तरेस असलेला हा किल्ला जलदुर्ग
प्रकारातील आहे. 12 एकर परिसरात पसरलेला किल्ला अजूनही मजबूत अवस्थेत आहे.
बालेकिल्ला आणि परकोट या दोन भागात किल्ल्याची रचना केली आहे. किल्ल्याच्या तीन
बाजूने पाणी असून बालेकिल्ल्यास महाद्वार आहे. किल्ल्याला जांभा पाषाणापासून
बनविलेली मजबूत तटबंदी आहे. तटबंदीच्या बाजूला खंदक कोरलेले आहेत. किल्ल्याला एकूण
28 बुरूज असून या बुरूजावरून समुद्राचे सौंदर्य न्याहाळता
येते. किल्ल्याच्या दरवाजापर्यंत वाहन पोहचते. गणपतीपुळे- जयगड अंतर 16 किलोमीटर
आहे.
जयगड येथील जेएसडब्ल्यु प्रकल्पाच्या
प्रवेशद्वारापासून डावीकडे जाणाऱ्या रस्त्याकडून पाच किलोमीटर अंतरावर कऱ्हाटेश्वर
मंदिर आहे. वाहन थेट मंदिरापर्यंत जाते. समुद्र किनाऱ्यावरील एक मोठ्या खडकावर हे
मंदिर उभारण्यात आले आहे. समुद्राच्या बाजूचा उंच कडा पाहतांना थरारक अनुभव येतो.
मंदिराच्या खालच्या बाजूस गोमुखातून अखंड वाहणारा झरा आहे. भरतीच्यावेळी निवांतपणे
उंचावरून खडकावर आदळणाऱ्या लाटांचा खेळ पाहण्यासाठी या प्राचीन मंदिराला अवश्य भेट
द्यावी.
कऱ्हाटेश्वर मंदिरापासून परततांना उजवीकडे
दीपस्तंभ दिसतो. शास्त्री नदीच्या मुखाशी असलेल्या या दिपस्तंभावरून समुद्र
किनारचा रम्य परिसर न्याहाळता येतो. दुपारी 3 ते 5.15 या वेळेत तिकीट काढून उंचा मनोऱ्यावर जाता
येते. उंचीवरून समुद्र न्याहाळण्याचा रोमांचीत करणारा अनुभव येथे पर्यटकांना
मिळतो.
जयगडहून चाफे फाट्याकडे येतांना डाव्या बाजूस
कोळीसरे गावाकडे जाणारा रस्ता आहे. येथून तीन किलोमीटर अंतरावर श्री
लक्ष्मीकेशवाचे मंदिर आहे. गर्द झाडीने वेढलेल्या मंदिराच्या बाजूस बारमाही
वाहणारा झरा आहे. निसर्गाच्या सान्निध्यात शांततेचे क्षण घालविण्यासाठी हे स्थान
अत्यंत योग्य आहे. मंदिरातील पाच फुट उंचीची श्रीलक्ष्मी केशवाची मुर्ती नेपाळमधील
गंडकी नदीपात्रातील काळ्या तांबूस रंगाच्या शालीग्राम शिळेतून घडविलेली आहे. मंदिर
परिसरात खाजगी भक्तनिवासाची सुविधा आहे. निवळीमार्गे जयगड रस्त्याला असणाऱ्या
कोळीसरे फाट्याचे अंतर 27 किलोमीटर आहे.
No comments:
Post a Comment