Blogger Tips and TricksLatest Tips And TricksBlogger Tricks

आपले स्वागत करीत आहोत

Sunday 3 April 2016

किल्ले

शतकानुशतके आपल्या जबरदस्त पाषाणी सामर्थ्याने जमीन आणि समुद्रावर दरारा निर्माण करणारे किल्ले हे मराठी साम्राज्याचे फार मोठे आधारस्तंभ होते. महाराष्ट्राची ही भूमी जवळजवळ ३५० हून अधिक किल्ल्यांनी समृद्ध आहे.
भारताच्या कोणत्याही प्रांताला हे एवढे दुर्गवैभव लाभलेले नाही. याच भूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांची तेजाने तळपणारी तलवार अत्यंत दिमाखात अधिराज्य गाजवत होती. एकेकाळचे मराठी सैन्याचे संरक्षक असलेले हे किल्ले आज आपल्या उज्ज्वल इतिहासाची मूक साक्ष देत अभिमानाने उभे आहेत.
पंचमहाभुतांच्या सततच्या माऱ्यामुळे पडझड, फूट झालेले किल्ले. आज जरी त्यांच्या भिंती ढासळू लागल्या असल्या आणि छप्पर उडून गेले असले तरी हे किल्ले, सामर्थ्यशाली मराठी साम्राज्याचा दरारा आणि रुबाब या बद्दल सतत प्रेरणा देतात. हे किल्ले दूरदृष्टी आणि सामर्थ्य यावर नक्कीच भाष्य करतात. सागरी असोत किंवा एखाद्या डोंगरावर वसलेले असोत, महाराष्ट्रातले हे किल्ले कोणत्याही ऋतूमध्ये तुम्हाला साद घालत असतात.


डोंगरी वैभव 

सातारा शहराचा पाठीराखा असलेला, समुद्रसपाटीपासून ३३०० फूट उंचीवरील अजिंक्यतारा या किल्ल्यावरून सातारा शहराचे दृश्य अत्यंत मनोहारी दिसते. तर औरंगाबाद शहराजवळ असलेला मजबूत असा दौलताबादचा दुर्गम दुर्ग १२ व्या शतकातील दुर्गस्थापत्याचा एक अजोड नमुना आहे. तसेच आपल्या उंचीमुळे प्रसिद्ध असलेल्या हरिश्चंद्रगड या किल्ल्यावर तर अगदी पाषाणयुगीन मानवाच्या अस्तित्वाचे पुरावे सापडले आहेत. 

महाबळेश्वरच्या विस्तीर्ण पठारावरून शिवरायांच्या लाडक्या प्रतापगडाचे अतिशय मोहक दर्शन घडते. तर लोहगड आणि विसापूर हे किल्ले तर डोंगर भटक्यांचे नंदनवनच आहेत. महाराष्ट्रातील सुस्थितीत किल्ल्यांपैकी एक असलेला आणि शिवरायांचे जन्मस्थान असलेला किल्ले शिवनेरी म्हणजे शिवप्रेमींचे एक तीर्थक्षेत्रच आहे. तर मराठी साम्राज्याची राजधानी असलेला रायगड हा किल्ला आपल्याला मोहित करणारा अत्यंत विलक्षण असा किल्ला असून तिथे असलेल्या रज्जूमार्गाने तुम्ही अगदी लीलया त्याच्या माथ्यावर जाऊन पोचता.


सिंधुसागरातील दुर्गवैभव 

वसईजवळील अर्नाळा बेटे ही अनेक जलदुर्गांनी वेढलेली आहेत. मुरुडजवळील जंजिरा हा सर्वबाजूंनी सागराने वेढलेला किल्ला कायम अजिंक्यच राहिलेला आहे. एखादी छोटीशी होडी घेऊन इथल्या स्थानिक लोकांसारखी एक छान फेरी मारावी, पिशवी भरून मासे गोळा करावेत किंवा आपली मोटरसायकल फेरी बोटीमध्ये टाकून खाडीच्या या तीरावरून अगदी सहज दुसऱ्या तीरावर जावे. 

महाराष्ट्राचे सागरीवैभव असलेला सिंधुदुर्ग हा किल्ला म्हणजे एका खडकावर शिवरायांनी उभारलेला एक अभेद्य जलदुर्ग आहे. या ठिकाणी सहलीला आल्यावर इतिहासकालीन घोडदौड आणि बलाढ्य सैन्याच्या हालचालींचा भास नक्कीच होईल. १२ व्या शतकात बांधलेल्या विजयदुर्ग किल्ल्याला त्यांच्या अभेद्यपणामुळे ब्रिटिशांनी जिब्राल्टर ऑफ द ईस्ट असे अत्यंत समर्पक नाव दिलेले आहे.


दुर्गामधील शहरे 

सुमारे ५०० वर्षांपूर्वीचा अहमदनगर किल्ला असो किंवा युरोपियन वसाहत सामावलेला पोर्तुगीज बसीन असो अनेक किल्ल्यांमध्ये गावे वसलेली आढळतात. मुंबईमधील सर्वात जुना ब्रिटीश किल्ला म्हणजेच फोर्ट हे नाव असलेला मुंबईचा एक भाग आहे. तर नांदेड जिल्ह्यातील कंधारचा किल्ला म्हणजे ९ व्या शतकातील राष्ट्रकूट साम्राज्याच्या राजधानीचे ठिकाण होते. महाराष्ट्रातील अनेक किल्ले तत्कालीन राजवटींच्या सामर्थ्य, दरारा, चातुर्य, आणि अधिकाराचे गोडवे गात आजही ताठ मानेने उभे आहेत. हे दुर्गवैभव आपल्या पुढच्या पिढीला आपल्या गौरवशाली इतिहासाची सदैव ओळख आणि जाणीव करून देत असते.


प्रतापगड (Mahabaleshwar) (ASI895253) मराठ्यांच्या इतिहासात छत्रपती शिवाजी महाराजांच्या वैभवाची साक्ष असणार्‍या ३६० किल्ल्यांपैकी प्रतापगडाचे स्थान फार महत्त्वाचे आहे. विजापूरच्या आदिलशहाचा पराक्रमी सरदार अफझलखान याचा त्यांनी प्रतापगडावर केलेला वध हा त्यांच्या व मराठ्यांच्या इतिहासातील निर्णायक क्षण ठरला. या किल्ल्यावरून जावळीचा निसर्गरम्य परिसर फारच रमणीय दिसतो. 
पर्वतरांगांनी व खोल दर्‍यांनी वेढलेला प्रतापगड महाबळेश्वर ह्या थंड हवेच्या ठिकाणाजवळ आहे. १० नोव्हेंबर 
१६५९ रोजी झालेल्या शिवाजी महाराज व अफझलखान यांच्या भेटीमुळे तो इतिहासात नोंदला गेला.
 हे दोन योद्धे भेटले तेव्हा उंच व आडदांड अफझलखानाने शिवाजी महाराजांना मैत्रीचा हात पुढे करण्याच्या 
मिषाने मिठी मारली व लपवलेल्या खंजिराने शिवाजीच्या पाठीवर वार केला. सुदैवाने कपड्यांच्या आत घातलेल्या 
चिलखतामुळे शिवाजी महाराज वाचले व चपळाईने आपल्या मुठीत अंगठीप्रमाणे घातलेल्या वाघनखांच्या एकाच 
वारात त्यांनी खानाचा कोथळा काढला. नंतर शिवाजी महाराजांचा विश्वासू सेवक 

इतर बाबी
  • भवानीमातेचे दर्शन
  • असं म्हणतात की जेव्हा शिवाजी महाराजांना राज्यकारभाराचा व्याप वाढल्यामुळे  भवानीमातेच्या दर्शनासाठी तुळजापूरला जाणे शक्य होईना तेव्हा त्यांनी प्रतापगडावर भवानीमातेचे मंदिर बांधले. मंदिराला ५० फूट लांब, ३० फूट रुंद व १२ फूट उंच लाकडी खांब आहेत. मंदिराच्या प्रवेशाला नगारखाना आहे. तेथे वेगवेगळ्या उत्सवांच्या वेळी नगारा वाजवण्यात येतो. तेथेच आता मराठ्यांनी वापरलेल्या तोफा पाहण्यासाठी ठेवण्यात आल्या आहेत. मंदिराच्या गाभार्‍यात भवानीमातेची काळी, साडी नेसवलेली मूर्ती आहे. युद्धात अफझल खानाच्या सैन्यातील ६०० सैनिकांना एकट्याने मारणार्‍या सरदार कान्होजी जेधे यांची तलवारही येथे पुजली जाते.

शिवनेरी (Pune) (AF8950533)

ऐतिहासिक ठिकाणची भटकंती, धाडसी पर्यटन आणि निसर्गाच्या सान्निध्यात फिरस्ती अशा सगळ्या गोष्टी एकत्र हव्या असतील तर किल्ले शिवनेरीला भेट देण्यासारखे दुसरे ठिकाण नाही. छत्रपती शिवरायांचे हे जन्मस्थान असल्यामुळे या जागेशी आपली भावनिक जवळीक तर आहेच, पण त्याचबरोबर  हे ठिकाण  गिर्यारोहणाचा कस लावणारेही आहे.
पुणे जिल्ह्याच्या उत्तरेला असलेल्या जुन्नर या तालुक्याच्या गावाच्या पाठीशी आहे हा शिवनेरी किल्ला. मराठा साम्राज्याच्या इतिहासात या किल्ल्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे कारण मराठी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांचे हे जन्मस्थान आहे. मात्र दुर्दैवाची बाब अशी की इ.स. १६५७ आणि १६७३ या साली शर्थीचे प्रयत्न करूनही हा किल्ला कधीही शिवरायांना जिंकून घेता आला नाही. पुढे इ.स. १७१६ मध्ये शाहू छत्रपतींच्या काळात हा किल्ला मुघलांशी झालेल्या एका तहानुसार मराठ्यांच्या ताब्यात आला.
किल्ले शिवनेरीला जाण्यासाठी जुन्नर या तालुक्याच्या ठिकाणी जावे लागते. जुन्नर हे पुणे आणि मुंबईशी रस्त्याने जोडलेले गाव आहे. किल्ल्यावर जायला दोन मार्ग आहेत, पैकी दक्षिणेच्या मार्गाने गेले की अर्ध्यापर्यंत डांबरी रस्ता बांधलेला आहे. त्याच्या पुढे पायऱ्यांच्या राजमार्गाने आपण सात दरवाजे पार करून किल्ल्यावर पोचतो. तर दुसरा मार्ग हा अवघड असून केवळ गिर्यारोहकच त्या मार्गाचा अवलंब करतात. या मार्गावर मधेच काही दगडामधील कोरीव लेणी दिसतात पण तिथपर्यंत जाण्याचा मार्ग कठिण आहे. त्यापुढील वाटेवर दगडामध्ये खोदलेल्या पायऱ्या लागतात. पण त्या पायऱ्या बऱ्याच ठिकाणी भग्नावस्थेत आहेत. दोन्ही बाजूकडून किल्ल्यावर पोचायला अंदाजे एक तास लागतो.
आज जरी किल्ल्याची अवस्था ऊन वारा पाऊस यामुळे काहीशी उजाड झालेली असली तरीसुद्धा त्यावरील बांधकामे हा नक्कीच अभ्यासाचा विषय आहे. पहिलीच दृष्टीस पडणारी वास्तू म्हणजे अंबरखाना किंवा धान्यकोठी ही होय. या धान्यकोठारात अनेक वर्षे धान्याची साठवणूक केली जायची. त्यापुढे जमिनीखाली खोदलेली गंगा जमुना नावाची दोन मोठी पाण्याची टाकी लागतात. काही तज्ज्ञांच्या मते या टाक्यांचा कालखंड हा अंदाजे २००० वर्षे पूर्वीचा, म्हणजेच सातवाहन काळापर्यंत मागे जातो. या किल्ल्यावर शिवरायांचा मुक्काम त्यांच्या आयुष्यातील पहिली सहा वर्षे इतकाच होता. कदाचित त्यामुळेच या किल्ल्यावर बालशिवाजीचा पुतळा बसवलेला आहे.
शिवाजी महाराजांचा जन्म ज्या ठिकाणी झाला ते ठिकाण सन १९२५ मध्ये पुन्हा बांधले गेले ज्याला आता शिवमंदिर असे म्हटले जाते. याच्याच जवळ एक पाण्याचा मोठा गोल तलाव आहे, ज्याला बदामी तलाव असे म्हणतात. पण यात फारसे पाणी साठत नाही. उत्तरेच्या एका टोकावर सरळ खोल असा एक कडा आहे. मृत्युदंडाची शिक्षा झालेल्या गुन्हेगारांना या कड्यावरून हात बांधून खाली दरीमध्ये फेकून देत असत त्यामुळे या ठिकाणाला कडेलोट असे नाव पडले. शिवनेरीवरून माणिकडोह जलाशय, चावंड आणि हडसर ह्या किल्ल्यांचे नयनमनोहर दर्शन होते. काहीसे उंचावर गेल्यावर डोंगर रांगांच्या पाठीमागे अगदी हरिश्चंद्रगडाचेसुद्धा सुंदर दर्शन इथून होते. त्याचबरोबर इथून नारायणगड, लेण्याद्री डोंगर, आर्वी इथल्या उपग्रह केंद्राचे अन्टेना तसेच खोडद इथल्या मीटर वेव्हलेंथ असलेल्या दुर्बिणीचेही मनोहारी दर्शन होते.
अंतर : मुंबईपासून १६० किलोमीटर


  • लेण्यांची भटकंती
  • शिवनेरीच्या आजूबाजूच्या डोंगरांमध्ये इ.स.पूर्व १ ले शतक ते इ.स.चे ३ रे शतक या कालखंडात कोरलेल्या जवळजवळ १०० हून जास्त बौद्ध लेणी अस्तित्वात आहेत. परंतु त्या सगळ्या लेण्यांपर्यंत जाणे शक्य नाही कारण तिथे जायचे मार्ग अनेक ठिकाणी उध्वस्त झाले आहेत. तरीसुद्धा जिथे जाणे शक्य आहे अशा ठिकाणी भेट देणे हे केवळ अभूतपूर्वच असते.

घोसाळगड (Raigad)


रोहा शहराजवळ, अवचितगड व घोसाळगड हे किल्ले आहेत. घोसाळगड हा किल्ला डोंगरावर वसलेला आहे. शिवपूर्वकाळात अस्तित्वात असलेला हा किल्ला ताम्हण घाटमार्गे होणार्‍या व्यापारावर लक्ष ठेवण्यासाठी बांधला असावा. जंजिरा, तळगड, घोसाळगड, ताम्हणघाट, घनगड असा तो व्यापारी मार्ग होता. या मार्गे कोकणातील बंदरावर उतरणारा माल घाटमाथ्यावर नेला जात असे.
रोहा शहराजवळ, अवचितगड व घोसाळगड हे किल्ले आहेत. घोसाळगड हा किल्ला डोंगरावर वसलेला आहे. शिवपूर्वकाळात अस्तित्वात असलेला हा किल्ला ताम्हण घाटमार्गे होणार्‍या व्यापारावर लक्ष ठेवण्यासाठी बांधला असावा. जंजिरा, तळगड, घोसाळगड, ताम्हणघाट, घनगड असा तो व्यापारी मार्ग होता. या मार्गे कोकणातील बंदरावर उतरणारा माल घाटमाथ्यावर नेला जात असे. छत्रपती शिवाजी महाराजांनी हा गड जिंकून घेतल्यावर त्याचे नाव बदलून ‘वीरगड’ असे ठेवले. मिर्झाराजे जयसिंग यांच्याबरोबर केलेल्या तहाप्रमाणे शिवरायांनी जे १२ किल्ले स्वत:कडे ठेवले त्यात ‘ घोसाळगड’ हा किल्ला होता, त्यावरुन या गडाचे तत्कालीन महत्व लक्षात येते.

घोसाळगड हा किल्ला कोणी बांधला हे ज्ञात नाही. १६व्या शतकात हा किल्ला निजामाच्या ताब्यात होता इस १६४८ मध्ये शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी हा किल्ला जिंकून घेतला. ‘‘रघुनाथ बल्लाळ(कोरडे) सबनीस सात पाच हजार मावळे खळक पाइचे घेऊन राजापुरीवर चालिले त्यांनी जाऊन राजापुरी पावेतो तळे, घोसाळे कुल देश मारुन सरद दरियाकिनारा मोकळा केला’’ असा उल्लेख सभासद बखरीत आहे. शिवरायांनी घोसाळगडचे नाव ‘वीरगड’ ठेवले इ.स १६५९ मध्ये सिद्दीने घोसाळगडला वेढा घातला, पण महाराजांनी अफजल खानाचा वध केल्याची बातमी ऐकून सिद्दी वेढा उठवून निघून गेला. त्यानंतर सिद्दी, आंग्रे, मराठे यांच्या ताब्यात हा किल्ला होता. इस १८१८ मध्ये कर्नल प्रॉथरने हा किल्ला जिंकून घेतला.

पोहोचण्याच्या वाटा :

मुंबईहून रोह्याला जावे. रोहा - भालगाव - मुरुड असा रस्ता आहे. या रस्त्यावर रोह्यापासून १० कि.मीवर घोसाळे हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे.